आजकाल रोज सकाळी एका अजबच दृष्याला मी अनायास श्रोता ठरतो. घरामागिल पसरलेल्या शेतांमध्ये उडालेल्या झुम्मडिचा! रोज सकाळी हिरव्यागार पोपटांचे थवेच्या थवे शेतावर उतरतात. लांबलचक, हिरवेगार, लाल चोचवाले, चंचल, जंगली पोपट! सुमारे ३००-४०० असावेत! पोपटांचा एवढा मोठा थवा यापूर्वी मी कधीही पाहिला नाही. शेतातील पेरू पिकायला लागल्याची गुप्त ख़बर त्यांना कुणी दिली, कुणास ठाऊक! हेच नाही तर ज्वारीचं हिरवं पीक आता सोनेरी दिसू लागलं आहे. कणसं उमलून त्यांतील टपोरे सोनेरी दाणे उन्हात लखलख चमकू लागले आहेत. यांचा मोह पोपटांना अनावर होणे साहजीक आहे.
शेत्कर्याची मात्र त्रेधा-तीर्पिट उडाली आहे. भल्या पहाटे तो गोफण धरून सावरा-बावरा धावतांना दिसतो. दीवसभर बिचारा मचाणावर बसून गोफण फिरवित असतो...
उन्हं चढू लागली की पोपट निघून जातात. मग मावळत्या संध्येची शेतावरील जादू काही औरंच असते...
सोनेरी कणसांवर एक लाल्सट छठा चढ़ते आणि वाहणार्या मंद झुळूकांवर शेत नागासवे डोलू लागते! क्वचितच कधीतरी संध्याकाळी शेतकर्यांची मुलं छोटीशी शेकोटी पेटवतात व कोवळा हुरडा भाजायला घेतात. त्या आगीत व त्या मावळत्या उन्हात झळाळणारे त्यांचे ते हसरे चेहरे व त्यांची ही न्याहारी, पोपटांच्या न्याहारीत्कीच प्रेक्षणिय असते!